नागपूर : देशभरात २०२३ या वर्षांत ६२.४१ लाख दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. यापैकी ३७.६३ लाख गुन्हे भारतीय दंड संहिते अंतर्गत तर २४.७८ लाख गुन्हे हे विशेष स्थानिक कायद्यांतर्गत नोंदवले गेले. २०२२ च्या तुलनेत एकूण सरासरी गुन्ह्यांत ७.२% वाढ झाली. राज्यातील गुन्हेगारीचा दर लाख लोकसंख्ये मागे ४२२.२ वरून ४४८.३ वर वाढला. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या ताज्या अहवालानुसार देशातील सायबर गुन्ह्यांच्या सर्वाधिक नोंदीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. यातील बहुतांश प्रकरणे आर्थिक फसवणूकीशी निगडीत आहेत. सायबर गुन्ह्यांची एकूण ८६ हजार ४२० प्रकरणे राज्यात नोंदवली गेली. यात ३१ टक्क्यांनी वाढ झाली. यापैकी ५९,५२६ (६८.९) टक्के प्रकरणे ही आर्थिक फसवणूकीशी निगडीत होती. सायबर गुन्ह्यांमध्ये २.३ टक्के प्रकरणांत अश्लिल साहित्य प्रसारणाचे कारण आढळले. लैंगिक शोषणाची ४,१९९ प्रकरणे पोलीस डायरीवर नोंद झाली. यातील ३ हजार ३२६ सायबर गुन्हे खंडणी होती. सायबर आर्थिक फसवणूकीशी निगडीत प्रकरणांत ७० टक्के प्रकरणे ही युपीआय, बँकिंग, क्रेडिट कार्डशी निगडीत आढळली. देशातील मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, सारख्या १९ महानगरांमध्ये एकूण ९ लाख ४४ हजार २९१ दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. त्यात ६ लाख ६७ हजार ३५१ प्रकरणे भारतीय दंड संहिता आणि २ लाख ७६,९४० स्थानिक कायद्यांतर्गत नोंद झाले. २०२२ च्या तुलनेत यात १०.६% वाढ नोंद झाली आहे.
सायबर गुन्ह्यातही नागपूर उपराजधानी
२०२३ या वर्षात नागपुरात सायबरच्या माध्यमातून झालेल्या फसवणूकीच्या ३०९ घटनांची नोंद घेतली गेली. सरासरी लोकसंख्येच्या तुलनेत ही टक्केवारी १२.४ ने वाढली आहे. महाराष्ट्रातील अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये सायबरची ४१३१ तर पुण्यात ४८७ प्रकरणे नोंद झाली. २०२२ मध्ये ही नागपुरात सायबर गुन्ह्यांची नोंद २११ तर २०२१ मध्ये १९२ प्रकरणे नोंदवली गेली होती. २०२३ मध्ये आयटी कायद्यांतर्गत ३२, ऑनलाईन फसवणूकीची २०३ आणि लैंगिक अत्याचाराची ३२ प्रकरणे नागपुरात नोंद झाली. ऑनलाईन फसवणूकीची मुंबईतील गुन्हे नोंद २३९६ तर पुण्यातील ३८१ इतकी नोंदवली गेली.
खुनाच्या गुन्ह्यांत २.८ टक्के घट
देशभरात खूनाच्या २७,७२१ प्रकरणांची नोंद घेतली गेली. जी २०२२ पेक्षा २.८% घटली आहे. खूनाच्या घटनांमागील प्रमुख कारणांमध्ये ९,२०९ प्रकरणांत जुना वाद, वैयक्तिक वैराला ३,४५८ तर १८९० प्रकरणांत स्वार्थ आणि लोभ ही कारणे आढळली आहेत. देशभरात अपहरणाच्या एकूण १ लाख १३ हजा ५६४ प्रकरणांची नोंद घेतली गेली. यात २०२२ च्या तुलनेत ५.६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. यातील १ लाख १६ हजार ४०४ व्यक्ती अपहरणाच्या बळी ठरल्या. यात महिलांची संख्या ९२ हजार ११४ तर पुरुषांची संख्या २४ हजार २८५ आढळली. त्यापैकी ८२ हजार १०६ बालके होती. यात ६६ हजार ७२ मुली तर १६ हजार ३३ मुले होती.
