भीमाशंकरचा सहकारी साखर कारखाना पारगाव चा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मेट्रिक टन दर
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मेट्रिक टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मेट्रिक. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.
गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मेट्रिक.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले.मुख्य संपादक अय्युब शेख तेज तुफान न्युज मंचर पुणे
